Saturday, 27 February 2016

"क्षण"

      (ही जुनी कविता सापडली एका वहीत. मराठीत काहीतरी लिहून खूप दिवस झाले हे अचानक जाणवलं आणि खूप वाईट वाटलं. इंग्रजीच्या पसाऱ्यात कुठेतरी मराठीशी असलेलं नातं हरवतंय असं वाटलं. म्हणून आज जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आणि नेहमीच्या इंग्रजी लेखनापेक्षा जरा वेगळेपणा हवा म्हणून ही कविता ब्लॉगवर टाकतेय. सगळ्यांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा!)

एक क्षणंच पुरेसा असतो,
      मनातलं गुपित ओठांवर यायला...
तरी तो क्षणंच पुरेेसा असतो,
      "आयुष्य" सारं बदलून टाकायला...

एक क्षणंच पुरेसा असतो,
      कुणा अनोळखीशी ओळख व्हायला...
तरी तो क्षणंच पुरेेसा असतो,
      आयुष्यभर साथ देणारी "मैत्री" बनायला...

एक क्षणंच पुरेसा असतो,
      "तो" दिसल्यावर पुन्हा वळून बघायला...
तरी तो क्षणंच पुरेेसा असतो,
      नकळत त्याच्या प्रेमात पडायला...

एक क्षणंच पुरेसा असतो,
      विस्कटलेल्या आयुष्याचा कंटाळा यायला...
तरी तो क्षणंच पुरेेसा असतो,
      जगण्याचा खरा "अर्थ" समजायला...

एक क्षणंच पुरेसा असतो,
      जगाच्या पसाऱ्यात स्वतःला हरवून बसायला...
तरी तो क्षणंच पुरेेसा असतो,
      त्याच गर्दीत आपलं "वेगळेपण" दिसायला...

एक क्षणंच पुरेसा असतो,
      कोणाला तरी मानापासून आनंद द्यायला...
तरी तो क्षणंच पुरेेसा असतो,
      ही "नाती" अशीच, कायम जपून ठेवायला...

खरंच...
      एक क्षणंच पुरेसा असतो...
पण तरी...
      तरी तो क्षणंच पुरेेसा असतो...

- गायत्री शेजवळ (१२ मे २०१३)

No comments:

Post a Comment